शिक्षकाकडून घेतली लाच...

संगमनेर : सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षकाकडे त्याच्या भविष्यातील पगारवाढीसाठी संस्थेतर्फे आडकाठी निर्माण न करण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. संबंधित शिक्षकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.


ही कारवाई शुक्रवारी (ता.२७) दुपारी चार वाजता सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली. या प्रकरणी शनिवारी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

बाबूराव राजाराम गवांदे (वय ७५, सेवानिवृत्त शिक्षक, सध्या सहसचिव सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था) आणि चंद्रभान काशिनाथ मुटकुळे (वय ६२, लेखनिक सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. 

त्यांच्याविरोधात संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील ३२ वर्षीय शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी शिक्षकाची शासनातर्फे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 

या शिक्षकाच्या भविष्यातील पगारवाढीसाठी संस्थेतर्फे आडकाठी निर्माण न करण्यासाठी गवांदे याने तीन लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ लाख रुपये लाच मागणी करण्यात आली. 

याबाबत संबंधित शिक्षकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यापैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकार करणारे गवांदे आणि मुटकुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post