अहिल्यानगर : आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर व महेश लांडगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी शहरातील व्यावसायिक नीलेश कन्हयालाल बांगरे (वय ४१, रा. रविश कॉलनी, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी त्यांनी म्हटले आहे की २८ जून रोजी त्यांचे मित्र सचिन तुकाराम पवार यांनी दौंड येथून व्हायरल झालेला एक व्हिडीओ त्यांच्या मोबाईलवर पाठवला.
या व्हिडीओमध्ये बादशहा शेख नावाचा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जमावासमोर बोलताना दिसत आहे. त्यात त्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांबद्दल अश्लिल, अपमानास्पद व अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे नमूद आहे.
व्हिडीओमध्ये केवळ व्यक्तिगत स्तरावर आक्षेपार्ह बोलण्यापुरतेच मर्यादित न राहता, संबंधित व्यक्तीने विशिष्ट धर्मीय समाजाला रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करण्यास चिथावणी देणारी विधाने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी बांगरे यांच्या मते, या प्रकारामुळे शहरामध्ये धार्मिक तेढ व दंगलसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे हा व्हिडीओ तयार करणाऱ्यावर तसेच प्रसारित करणाऱ्या बादशहा शेख याच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शितल मुगडे करीत आहेत.
Post a Comment