शासन निर्णयानुसार बीएलओ या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळण्याचे निर्देश निर्गमित

अहिल्यानगर : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांच्या २३ ऑगस्ट २०२४च्या शासन निर्णयानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ या शासनाने जाहीर केलेल्या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळणेकामी  जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुपसिंह यादव यांनी निर्देश जाहीर केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली.


जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २९एप्रिल २०२५ रोजी निवेदन देऊन समक्ष चर्चा केली होती . याचवेळी राज्याचा शासन निर्णय व भारत निवडणूक आयोगाच्या बीएलओ नियुक्तीबाबतच्या ४ ऑक्टोबर २०२२ च्या सर्व समावेशक सूचनांबाबत सविस्तर चर्चा झाली. 

याच विषया संदर्भात अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही बीएलओ या निवडणूक विषयक अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळणे बाबतची शिफारस ११ एप्रिल २०२५ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली होती .

तत्पूर्वी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी ८ऑक्टोबर २०२४  व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना निवेदन देऊन म्हटले होते की निवडणूक विषयक निरंतर चालणारे बीएलओचे हे काम शासनाने  अशैक्षणिक म्हणून जाहीर केले.

काही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी हे या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरीता उदासीन आहेत . परिणामी राज्यातील शिक्षकांना नाईलाजाने हे काम करावे लागत असल्याचे त्यांचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. 

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी योगेश गोसावी यांनी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत .

दरम्यान अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी थेट नवी दिल्ली येथील भारत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात ६ ऑक्टोबर २०२३ रोजी शिक्षकांना बीएलओच्या कामातून वगळणे बाबतचे निवेदन दिले होते . या निवेदनाची दखल घेत भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना १७ नोव्हेंबर २०२३ रोजी निर्देश देऊन शिक्षकांच्या बीएलओ नियुक्तीबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनुपसिंह यादव यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी व तहसीलदार यांना शासन निर्णयाचा आधार घेऊन ४ जून २०२५ रोजी पुढील नियमोचित कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश दिल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक हे बीएलओ या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून मुक्तता होऊन त्यांना वगळले जाणार असल्याचे अखिल श्रीगोंदा संघाचे तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना निवेदन देतेवेळी संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे ,ऐक्य मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर रणदिवे , श्रीगोंदा संघाचे तालुकाध्यक्ष नंदू गायकवाड, नेवासा तालुका ऐक्य मंडळाचे सरचिटणीस लेवीस तिजोरे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post