कोपरगावमध्ये एकावर कोयत्याने वार...

कोपरगाव : शहरातील गांधीनगर परिसरात भवानी चौकात गुरुवारी रात्री एका तरुणावर कोयता, लोखंडी पाइप आणि बेसबॉलच्या दांड्याने निर्घृण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रूपेश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २३, रा. गांधीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही घटना गुरुवारी रात्री सुमारे १२.३० वाजता घडली. रूपेश गायकवाड भवानी चौक परिसरातून जात असताना अचानक हर्षल रोकडे, रोहित कुंढारे, गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे या चौघांनी त्याला आडवले. 

हर्षल रोकडेने गळा पकडून त्याला खाली पाडले आणि बेसबॉलच्या दांड्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर इतर तिघांनी लोखंडी पाइप आणि धारदार कोयत्याने रूपेशवर वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत रूपेशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. 

रूपेश गायकवाड याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हर्षल रोकडे, रोहित कुंढारे, गणेश रोकडे आणि वैभव कुऱ्हाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post