अहिल्यानगर : जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 7 % या अल्प दराने 995 कोटीचे कर्ज वाटप केले असून, सर्व आवश्यक त्या तरतुदी करून 9 कोटी 89 लाखाचा नफा मिळवला आहे.
संस्थेची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 13 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता बुरुडगाव रोड, भोसले आखाडा येथील नक्षत्र लॉन येथे होत असून, संचालक मंडळाने 6 टक्के दराने लाभांश देण्याचे सुचविले असल्याची माहिती चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.
संस्थेचे ठेवी आर्थिक वर्षात 734 कोटीवर पोहोचलेल्या आहेत संचालक मंडळाने सेवानिवृत्त सभासद संख्या पाहता व कृतज्ञता निधीच्या रकमेची तफावत पाहता नवीन पोटनियम यावेळी दुरुस्तीसाठी ठेवण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके यांनी दिली.
संस्थेच्या इतिहासामध्ये सभासदांनी तब्बल 22 वर्षानंतर प्रथमच स्वाभिमानी परिवर्तन मंडळास झालेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने सर्व उमेदवारास विजयी केले. सर्व संचालकांवर संस्थेच्या सभासदांनी जो विश्वास टाकला आहे, त्याचप्रमाणे संस्थेचा कारभार अत्यंत काटकसरीने करण्यावर भर देणार आहे.
मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेचा कॅश क्रेडिटचा व्याजदर वाढलेला असून देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा यावर्षी बँक कॅश क्रेडिटची उचलही वाढल्या कारणाने कॅश क्रेडिटचे व्याज हे रुपये 3 कोटी 25 लाख इतके कॅश क्रेडिट पोटी जास्तीचे गेलेले आहे. त्याचा परिणाम संस्थेच्या या वर्षीच्या नफ्यावर झालेला दिसून येतो.
सहकार आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार संस्थेने नव्याने यावर्षी उत्तम जिंदगीची तरतुदीपोटी 2 कोटी 47 लाख इतकी तरतूद करावी लागल्याने त्याचाही परिणाम लाभांशावर झालेला दिसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
13 जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्या दिवशी सभासदांच्या वर्गणीच्या ठेवीवर 4टक्के प्रमाणे व्याजदर लाभांश 6% याप्रमाणे अशी एकूण 23 कोटी 38 लाख रुपये वाटप करण्यात येईल, अशी माहिती संचालक मंडळाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मयत सभासदांचे पूर्ण कर्ज माफ करून मयताच्या ठेवी व शेअर्स कर्जात वर्ग न करता त्यांच्या वारसांना देणारी ही राज्यातील एकमेव संस्था आहे. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने 59 मयत सभासदांचे 5 कोटी 28 लाख रुपये कर्ज माफ केले असून, त्यांच्या वारसांना सभासदांच्या सहकार्याने 2 कोटी 91 लाख इतकी त्यांची जमा रक्कम कर्जास वर्ग न करता परत करण्यात आलेली आहे.
कन्यादान भाग्यलक्ष्मी योजने अंतर्गत सभासदांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी विनापरतावा नफ्यातून 15 हजार रुपये प्रत्येकी याप्रमाणे 479 इतक्या सभासदांना एकूण 71 लाख 85 हजार इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. दिव्यांग सभासदास व्याजात 1% वाढ देऊन 1 लाख 24 हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.
देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातील वीरमरण आलेल्या शहीद जवानांच्या वारसांना प्रत्येकी 1 लाखाचा निधी देण्यात येतो. यावर्षी अकोले येथील शहीद जवानांच्या वारसांना 1 लाख रुपये निधी देण्यात आला.
अशा विविध योजनांची सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळे यशस्वीपणे अंमलबजावणी होत असल्याने तसेच कर्जावर 7% टक्के या कमीत कमी व्याज आकारणीमुळे पगारदार सेवकाची संस्था जिल्ह्यातच नाही तर राज्यातही नावलौकिक मिळवला आहे. तसेच नूतन संचालक मंडळ यापेक्षाही काटकसरीने कारभार करणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वसाधारण सभेत सभासद हिताच्या सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहावे, अशी विनंती संचालक बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, उमेश गुंजाळ, महेंद्र हिंगे, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बालाजी गायकवाड, छबु फुंदे, साहेबराव रकटे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, उद्धव सोनवणे, सचिन जाधव यांनी केले.
Post a Comment