श्रीगोंदा : शालेय पोषण आहारात आर्थिक अनियमितता व शाळेतील मुलींना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील मुलींच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबित केले.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, अरविंद कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन केल्याने निलंबनाचा तडकाफडकी आदेश काढण्यात आला.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी आंदोलकांनी प्रथम श्रीगोंदा पंचायत समितीसमोर घंटानाद आंदोलन केले. त्यावर गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनी मुख्याध्यापिका जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला होता.
पीएमश्री योजना व पोषण आहारातील अनियमितता आणि विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी आंदोलकांची मागणी होती.
मुख्याध्यापिकेने पोषण आहारात तसेच पीएमश्री योजनेतून शाळेला मिळालेल्या अनुदानात अपहार केल्याची तक्रार टिळक भोस, अरविंद कापसे, अरविंद राऊत व सतीश बोरुडे यांनी केली होती.
त्यांनी तक्रारी केल्याने त्यांच्या पाल्यांना या शाळेत मुख्याध्यापिकांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचीही तक्रार पंचायत समितीकडे दाखल झाली होती. त्यानुसार तीनही प्रकरणी मुख्याध्यापिकेची चौकशी करण्यात आली.
त्यानुसार या तिन्ही प्रकरणांचे चौकशी अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आले. पंचायत समितीनंतर आंदोलकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. अखेर सीईओंनी जगताप यांच्या निलंबनाचा आदेश काढला.
या आंदोलनात टिळक भोस, अरविंद कापसे, रामदास नन्नवरे, नाना शिंदे, अरविंद राऊत, सुनील ढवळे, सतीश बोरुडे, प्रदीप ढवळे, तौसीम शेख यांनी भाग घेतला.
Post a Comment