राहुरी : तालुक्यातील मुळा धरण परिसरात एका ओढ्यातील पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत आहे, अशी खबर मिळाल्याने पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पाहणी केल्यानंतर तो मृतदेह नसून शेतात पाखरांना भीती दाखवण्यासाठी लावले जाणारे बुजगावने निघाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
राहुरी तालुक्यातील मुळा धरण परिसरातील ओढ्यात काल 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पॅन्ट आणि शर्ट घातलेला एका पुरुषाचा मृतदेह त्या ओढ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृतदेह कोणाचा आहे, हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या बाबत पोलिस प्रशासनाला खबर मिळाली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ताबडतोब सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ, हवालदार सागर नवले, चालक साखरे आदी पोलीस पथकासोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने ओढ्यातील पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह पाहून पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्यासह सर्वांनीच डोक्याला हात मारला.
तो कोणत्या पुरुषाचा मृतदेह नसून शेतात पाखरांना भिती दाखवण्यासाठी लावले जाणारे बुजगावणे होते. बुजगावणे पाहून पोलिस पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र उपस्थित असलेल्या नागरिकांना हसू आवरता आले नाही.
Post a Comment