अहिल्यानगर -2007 मध्ये राज्यात गाजलेल्या बहुचर्चित टँकर घोटाळ्यात कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानूसार नगरच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
सोमवार (दि. 30) या घोटाळ्यातील फिर्यादी पांडूरंग दरेवार (तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग) यांची साक्ष सरकारी वकील अमित यादव यांनी घेतली. त्यानंतर आरोपींच्यावतीने या साक्षीची उलट तपासणी झाली आहे. यावेळी सुनावणीला गैरहजर राहणार्या दोन सरकारी पंचांच्या विरोधात न्यायालयाने जामीनपात्र वारंट काढले आहे.
दरम्यान, या घोटाळ्याच्या तपासात नगर पंचायत समितीच्यावतीने अदा करण्यात आलेल्या पाण्याच्या टँकरच्या बिलांवरील नंबरची चौकशी समितीने प्रादेशिक परिवहन कार्यालयात पडताळणी केली असता संबंधीत नंबर हे दुचाकी व ट्रेलरची निघाली असल्याचे यावेळी फिर्यादी यांच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर त्यांची साक्ष व त्यावर उलट तपासणी होवून न्यायालयाने आता पुढील सुनावणी 4 जुलैला ठेवली आहे.2006-07 या टंचाईच्या कालावधीत नगर व पाथर्डी पंचायत समितीत सरकारी पाण्याच्या खेपा वाढवून जादा दाखवून सरकारी पैशाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.
यात एकट्या नगर पंचायत समितीत 1 कोटी 15 लाख तर पाथर्डी पंचायत समितीत जादाची 28 लाखांची जादाची डिजेल बिले काढण्यात आल्याचा ठपका तत्कालीन चौकशी समितीने ठेवत संबंधीतांवर कारवाई केली होती.
त्यानंतर नगर पंचायत समितीच्या घोटाळाप्रकरणी 1 मे 2008 मध्ये तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद पांडूरंग दरेवार यांच्या तक्रारीवरून नगरच्या कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यावर 18 जून 2025 रोजी नगरचे दिवाणी न्यायाधिश एस. आर. शिंदे यांच्या न्यायालयात केस नंबर 369/12 नुसार सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी फिर्यादी व साक्षीदार गैरहजर असल्याने ही सुनावणी सोमवार (दि.30) रोजी पार पडली. यावेळी फिर्यादी दरेवार यांच्या साक्ष सरकारी वकील अमीत यादवी यांनी घेतली.
यात फिर्यादी यांच्यावतीने दिलेल्या जबाबात या घोटाळ्याच्या तपासणीत चौकशी समिती काय समोर आले याबाबतची माहिती देण्यात आली. नगर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीमधील कर्मचारी व नेमण्यात आलेल्या पाणी पुरवठा संस्थेच्यावतीने दाखवण्यात आलेल्या 19 पाण्याच्या टँकरच्या नोंदणी नंबरपैकी काही नंबर हे दुचाक्या व ट्रेलरची असल्याचे परिवाहन खात्याच्या नोंदीवरून समोर आले.
सुनावणी दरम्यान फिर्यादी यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. दरम्यान फिर्यादी यांनी दिलेल्या साक्षची आरोपीचे वकील राजेंद्र शेलोदे यांनी उलट तपासणी यावेळी झाली. सुनावणीला गैरहजर असणारे तत्कालीन सरकारी पंच संजय उपाध्ये व राजेंद्र पडोळे यांच्या विरोधात न्यायालयाने जामिनपात्र वारंट काढले आहे.
या प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे लिपिक, सहाय्यक लेखाधिकारी व सरकारी पाण्याचे टँकर चालक असे 25 आरोपी असल्याने सोमवारच्या सुनावणीच्या वेळी नगरचे दिवाणी न्यायाधिश शिंदे यांच्या दालनात तोबा गर्दी झाली होती. 2007 नंतर अनेक वर्षे राज्य पातळीवर गाजलेल्या आणि वेगवेगळ्या चौकशीच्या फेर्यात अडकलेल्या या प्रकरणावर आता सुमारे 17 ते 18 वर्षानंतर न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
Post a Comment