.नेवासा : नेवासा नगरपंचायतसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी पूर्णपणे स्वबळावर उतरणार आहे. विकास, पारदर्शकता व भ्रष्टाचारविरोधी लढा हा मुख्य अजेंडा असणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील फाटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजू आघाव, संदीप आलवने, राजेंद्र नागवडे, तिलक डूगुरवाल, देवराम सरोदे, किरण भालेराव, रामचंद्र लाड, ॲड. शिंदे मॅडम, अशोक डोंगरे, करीम सय्यद, अण्णा लोंढे, शंकर शिंदे, विठ्ठल मैंदाड आदी उपस्थित होते.
अजित फाटके म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शहरात केवळ विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गटारे, रस्ते, शाळा, पाणी योजना यामध्ये उघडपणे टक्केवारीचा व्यापार चालतोय. हे सगळं नेवासकर पाहत आहेत. ही चटकन न सडणारी व्यवस्था आम आदमी पार्टी मोडून काढणार आहे.
ते म्हणाले, शनिशिंगणापूर देवस्थान आणि संत ज्ञानेश्वर मंदिर या पवित्र स्थळांचा काही नेते केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर करत आहेत. श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना जनता आता कंटाळली आहे. ही मंदिरे कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय चालली पाहिजेत. यासाठी या देवस्थानांची धुरा महंत भास्करगिरी महाराज यांच्याकडे देण्यात यावी.
आम्ही ज्या गोष्टींचा भांडाफोड करतो आहोत, त्यामागे फक्त भावना नाहीत तर ठोस कागदोपत्री पुरावे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या काळातील भ्रष्टाचाराचे संपूर्ण दस्तऐवज योग्य वेळी जनतेसमोर ठेवणार आहोत, असा इशाराही फाटके यांनी दिला.
तालुकाध्यक्ष ॲड. सादीक शिलेदार म्हणाले, आम्ही कोणत्याही बाहेरच्या नेत्यांवर विसंबून नाही. नेवासा नगरपंचायतीसाठी स्थानिक नेतृत्व उभं राहील. आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी केवळ आपले राजकीय गोट मजबूत केले, पण नेवासेकरांच्या समस्या तसेच राहिल्या. आम्ही त्या प्रश्नांवर ठोस कृती करू.
आज जनता पारंपरिक पक्षांवर नाराज आहे. ती प्रामाणिकपणा आणि काम करणारी टीम शोधते आहे. आम आदमी पार्टीचं राजकारण हे ‘जनतेच्या प्रश्नांवर आधारित’ असून, नेवासेकरांना नव्या आशेचा पर्याय देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले.
Post a Comment