नेवासा : तालुक्यातील सलाबतपूर मंडळ परिसरात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाचा झपाट्याने फैलाव होत असून, शेतकरी आणि पशुपालक यांच्यावर मोठा आर्थिक व मानसिक ताण निर्माण झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील या परिसरात लंपी रोगाच्या प्रादुर्भावाने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे
कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे यांनी दिघी रोड व आजूबाजूच्या गावांमध्ये पाहणी करत जनावरांमध्ये आढळणाऱ्या लंपीच्या लक्षणांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "लंपी त्वचा रोग संसर्गजन्य असून, हा रोग गोवंशीय जनावरांमध्ये विषाणूमुळे होतो. रोग पसरल्यास जनावरांचे दूध उत्पादन कमी होते, वजन घटते, वाळके तयार होतात, ताप येतो आणि काही वेळा मृत्यू देखील होतो. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती आहे.
या रोगाचा मुख्य प्रसार डास, माशी, कीटक किंवा बाधित जनावरांच्या थेट संपर्कातून होतो. अनेक जनावरांना त्वचेवर गाठी येणे, सतत ताप, खाण्याचे प्रमाण कमी होणे आणि अंगात सूज येणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. या रोगाने प्रभावित जनावरांची उत्पादकता लक्षणीयरीत्या कमी होते.
परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अहमदनगरच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकडे तातडीने लसीकरण मोहिम हाती घेण्याची मागणी केली आहे. रोगाचे गांभीर्य लक्षात घेता, लसीकरणासोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनावरांची विलगीकरण व्यवस्था, औषधोपचार, आणि जनजागृती मोहीम तातडीने राबवावी अशी जोरदार मागणी आहे.
स्थानिक प्रशासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, परिसरात आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत आणि रोग नियंत्रणासाठी आवश्यक निधी व साधनसामग्री त्वरित उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनांनी केले आहे.
जर या रोगावर तातडीने उपाययोजना न झाल्यास जनावरांचा मृत्यूदर वाढू शकतो, दुग्ध व्यवसाय उद्ध्वस्त होऊ शकतो, व शेती व्यवसायावर मोठे संकट ओढवू शकते. यामुळे संपूर्ण शेतकरी समाजाच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Post a Comment