नेवासा ः नेवासा शहरातील अहिल्यानगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास कालिका फर्निचर दुकानाला आग लागली. या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण नेवासा हादरले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
ही आग नेवासा फाटा रोडवरील कालिका फर्निचर या दुकानाला लागली. हे दुकान मयूर रासणे यांचे असून, दुकानाच्या वरच्या मजल्यावरच ते पत्नी, दोन मुले व वयोवृद्ध महिलेसह राहत होते. मध्यरात्री अचानक दुकानात आग लागली आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे रासने कुटुंबियांना दुकानाचा बाहेर पडता आले नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयूर रासणे यांचे आई-वडील बाहेरगावी गेलेले असल्याने ते या दुर्घटनेतून वाचले. मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा या आगीत दुर्दैवी अंत झाला.
सदर गोडावून सुमारे ५००० स्क्वे. फूट आकाराचे असून, पूर्णतः पत्र्याच्या भिंती व छताचे आहे. आतमध्ये सोफा, दिवाण, कूलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, आदी महागड्या वस्तू होत्या. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. दरम्यान, संपूर्ण नेवासा शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत मयूर रासणे, पायल रासणे, अंश रासणे, चैतन्य रासणे, एक वयोवृद्ध महिला यांचा मृत्यू झालेला आहे. एकजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आग नेकमी कशामुळे लागली याचा पोलिस शोध घेत आहे.
Post a Comment