अहिल्यानगर : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर साचलेला कचरा, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी आणि वाढलेले आजारांचे प्रमाण, यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून, याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक अविनाश घुले यांनी मनपा आरोग्य विभागावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
आरोग्याशी खेळणारा आरोग्य विभाग – घुले यांचा आरोप
माजी नगरसेवक घुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी सरळ-सरळ खेळ करत आहे. मनपा सर्वच गोष्टीत अव्वल असल्याचे दावे करते, पण प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबितच आहे. प्रत्येकवेळी नागरिकांना फोन करून कचरा उचलण्याची विनंती करावी लागते, आणि त्यावरही फक्त उडवाउडवीची उत्तरे मिळतात."
घंटागाडी येतेच नाही; महिलांना विशेष त्रास
स्थानिक नागरिकांच्या मते, काही भागांत १० ते १५ दिवसांपासून घंटागाडीच आलेली नाही. अनेकदा गाडी आली तरी त्यात फक्त ड्रायव्हर असतो, मदतनीस नसतो. त्यामुळे गाडी उंच असल्यामुळे महिलांना कचरा टाकणे कठीण जाते. मनपा दरवर्षी कराच्या माध्यमातून पैसे गोळा करते, मात्र मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरते, असा आरोप घुले यांनी केला.
टेंडर प्रक्रियेत विलंब, त्यामुळे घंटागाडी अनियमित
मनपाने कचरा संकलनासाठी अद्यापही टेंडर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळेच घंटागाडी वेळेवर येत नाही किंवा अनेक वेळा संपूर्ण दिवस गायब असते. यामुळे कचऱ्याचे ढीग वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
तीन दिवसांची डेडलाईन, अन्यथा आंदोलन
घुले यांनी मनपा प्रशासनास तीन दिवसांची मुदत दिली आहे. "जर तीन दिवसांत घंटागाडी नियमित सुरू झाली नाही, तर नागरिकांना घेऊन मनपा आवारातच कचरा टाकून तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांचा पाठिंबा
स्थानिक नागरिकांनीही माजी नगरसेवक घुले यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित, पावसाळ्यात रोगराई पसरण्यापूर्वी कचरा संकलनाची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी केली आहे. "दुर्गंधीमुळे मुलांना बाहेर सोडणेही अवघड झाले आहे. वेळेत पावले उचलली नाहीत, तर रुग्णसंख्या वाढेल," अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment