संगमनेर ः संगमनेर तालुका एकीकडे चार आमदार, एक माजी मंत्री, विविध पक्षांचे प्रभावशाली नेते आणि भक्कम राजकीय उपस्थिती लाभलेला तालुका असताना, इथे सामान्य नागरिकांना अजूनही मूलभूत विकासासाठी झगडावे लागत आहे. नेमके नेतृत्व नसल्याने हा तालुका आजही मागासलेपणाच्या गर्तेत अडकलेला आहे. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनानंतर उसळलेल्या वादामुळे संपूर्ण परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर तालुक्याला राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. सध्या तालुक्यात एकाचवेळी चार आमदार आहेत. त्यात काही सत्ताधारी, काही विरोधी पक्षात. याशिवाय, एक माजी मंत्रीसुद्धा इथून निवडून गेलेला आहे. इतका राजकीय पाठिंबा असूनही, संगमनेरमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज या मूलभूत सुविधा अजूनही अपुऱ्या आहेत. सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत.
ग्रामीण भागात वीजपुरवठा विस्कळीत आहे आणि बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. सत्तेत असणारे नेते तालुक्याच्या हितासाठी एकत्र येऊन काम करत नाहीत. परस्पर विरोधी गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने कोणताही प्रकल्प एकमताने पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे निधी मंजूर होऊनही तो वेळेवर खर्च होत नाही, प्रकल्प रखडतात, आणि नागरिकांच्या अपेक्षा अपूर्ण राहतात.
या राजकीय अस्थैर्याचा परिणाम थेट प्रशासनावर होत आहे. सध्या तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी आपल्या पदावर समाधानी नाहीत. बहुतांश अधिकारी केवळ बदलीच्या प्रतीक्षेत असून, कुणालाही इथे दीर्घकाळ काम करायची तयारी नाही. याचा थेट परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होतो. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव असून, त्याचा फटका जनतेला सहन करावा लागत आहे.
याच दरम्यान, प्रसिद्ध कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या अलीकडील कीर्तनात केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद उफाळला आहे. त्यांच्या भाषणातील काही भागाला काही गटांनी आक्षेप घेतला असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका, प्रतिक्रिया आणि द्वेषपूर्ण पोस्ट्स फिरत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावपातळीवर काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याची माहिती असून, प्रशासनाने तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. शांतता समित्यांच्या बैठका घेऊन संयम राखण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अनेक नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता कीर्तन, सभा यांनाही राजकारण व सामाजिक तणावाने विळखा घातला असून, धार्मिक कार्यक्रमांनंतर असुरक्षित वाटू लागले आहे.
संगमनेरच्या सद्यस्थितीकडे पाहता, एक ठोस, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, राजकीय गटांमधील समन्वय आणि प्रशासनाची कार्यक्षमता या गोष्टी अत्यावश्यक बनल्या आहेत. त्याशिवाय, ना विकास शक्य आहे ना शांतता. संग्रामबापू भंडारे यांच्या प्रकरणातून निर्माण झालेला तणाव अधिक बिघडण्याआधी संवाद आणि समजूतदारपणाचे धोरण राबवणे आवश्यक आहे.
Post a Comment