संगमनेर ः घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनादरम्यान संग्रामबापू महाराज यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट जीव देण्याची धमकी दिली. “नथुराम गोडसे व्हावं लागेल” असं वक्तव्य करून वादाला तोंड फुटले. यावर थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “महाराज जर गोडसे व्हायला तयार असतील, तर मी गांधी बनून बलिदान द्यायला तयार आहे.
लोकशाहीसाठी असं बलिदान मिळण्यात मला आनंद वाटेल. ”थोरात यांनी पुढे सांगितले की, वारकरी संप्रदायात असताना पथ्य पाळावं लागतं. अशा ठिकाणी राजकीय भाष्य होणे योग्य नाही. घुलेवाडीतील कार्यक्रमात नकारात्मक कीर्तन सुरू झाल्यानं त्याला विरोध झाला. त्यानंतर खोट्या गुन्ह्यांचे उद्योग सुरू झाले आहेत. काही कीर्तनकार राजकीय हेतूने वक्तव्य करत असून पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
मी महात्मा गांधी नाही, पण त्यांच्यासारखे बलिदान द्यावे लागले तरी ते लोकशाहीसाठी असेल. आम्ही वारकरी परंपरेत राहिलो आहोत. अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आमच्याकडून कधीही द्वेष पसरवला जात नाही. हे सगळं केवळ सत्तेसाठी सुरू आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमधून दंगली भडकवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी केली. देशातील राजकारणाची पातळी खालावली आहे. राज्यात तर राजकारणाचा तळ गाठला गेलाय, असे थोरात म्हणाले.निवडणूक आयोगावरही त्यांनी टीका केली.
Post a Comment