आठवणीतील बैलपोळा....

तो काळ साधारण ३५-४० वर्षे पाठीमागचा.... आम्ही १०- १५ वर्षांचे असू.... बैलपोळा तसा ग्रामीण समाजजीवनाशी जोडलेला सण...‌! वर्षभर आपल्या धन्यासाठी राबणाऱ्या बैलांचे कोडकौतुक व पूजा करण्याचा सण....! किती निर्मळ भावना? वर्षभर राबराब राबून आपल्या धन्यासाठी झिजणाऱ्या बैलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एकदिवस....! किती कृतज्ञता?


त्या काळी कळमकरवाडीतील आम्हा मुलांची पोळ्याची तयारी पंधरा दिवस आधीच सुरू व्हायची....! घायपाताचा(केतकाड) कडाका तयार करण्यासाठी आम्ही मुले एकत्र येऊन ओढ्याच्या डोहात घायपात सोलून भिजत घालायचो. साधारण आठ दिवसांनी ते चांगले भिजल्यावर ओढ्याच्या काठावरील खडकावर झोडायचं आणि मग त्याच्यापासून पांढरे शुभ्र वाख तयार व्हायचे. खूप आनंद व्हायचा ते पांढरे शुभ्र वाख स्वतः तयार केल्याचा....! नवनिर्मितीचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण...! तयार झालेले वाख आणि मोठ्या कष्टाने तोडलेले वडाच्या पारंबीचे टिपरे घेऊन आम्ही मुले भल्या सकाळी लहानूतात्यांकडे जायचो....

लहानतात्या म्हणजे अजब रसायन....! तमाशा कलेचे प्रचंड वेड असणारा हा माणूस स्वतः अफलातून कलाकार होता. बैंलासाठी जुपणी, मुस्के, गोफण,  म्होरकी, कडाका या वाखापासून वस्तू बनविण्यात हातखंडा....! या वस्तू बनविण्यासाठी गेलेल्या कोणत्याही गरजवंताला त्यांनी या वस्तू बनविण्यासाठी कधीच नकार दिला नाही आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा  केली नाही. जे दिलं ते मोकळा मनाने स्विकारलं....! अखंड वाडीतील सर्व शेतकऱ्यांना या दैनंदिन गरजेच्या वस्तू बनवून देणे हे आपले परम् कर्तव्य आहे हे माणून या माणसाने शेवटपर्यंत संपूर्ण वस्तीची सेवा केली....


बैलपोळ्याच्या आधीच दोन- चार दिवस आम्ही मुले लहानतात्याकडून कडाका तयार करण्यासाठी नंबर लावायचो....कडाका जोरात गोल फिरवून वाजवला की जोरात आवाज व्हायचा.... सगळ्या रानातून आवाज घुमायचा.... कडाक्याच्या नुसत्या आवाजाने जनावरे घाबरायची....

पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटे उठून बैलांच्या डोंगराला बैले चारण्यासाठी घेऊन जायची.... बैलपोळ्याचा अगोदर दोन - तीन दिवस बैलांची शिंगे घोळण्यासाठी व शिंगांना पितळाच्या नक्षीदार शेंब्या बसविण्यासाठी कारागिर यायचा.... त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी नंबर लागायचे.... मोठ्या मेहनतीने शिंगे घोळून आकारबद्ध करून तो कारागिर बैलांच्या शिंगांना टोक काढून पितळाची शेंब्या बसवायचा....

पोळ्याच्या दिवशी दहा- अकरा वाजता पिराच्या किंवा येलदऱ्याच्या तळ्याच्या मोठ्या पाण्यात बैल पोहून, साबणाने स्वच्छ धुवून काढले जायचे. नाठाळ बैल पाण्यात शिरायला चांगलेच त्रास द्यायचे.... अशा नाठाळ अन् रांगड्या बैलांना हमखास वठणीवर आणून मनसोक्त पाण्यात पोहायला लावायची कला आमच्या आबांना चांगलीच अवगत होती.... बैल धुवून झाले की घरी येऊन इतर जनावरे स्वच्छ धुतली जायची....‌

तळ्याच्या पाण्यात बैलांना मनसोक्त पोहून झाल्यावर घराकडून रानात येताना सोबत आणलेला साजूक तुपातील,गुळ, भाकरीचा मलिद्याचा गोड घास बैलांना भरविला जायचा.... त्यानंतर सोबत आणलेला हिंगळ बैलांच्या शिंगांना रानातच धरून लावला जायचा.... शिंगांना रंगीबेरंगी हिंगळ लागलेले बैल खूपच छान दिसायचे.... दिवसभर सगळ्या रानातून दिवाळीच्या फटाक्यांसारखा कडाक्यांचा आवाज चालू असायचा..‌... सगळं रान एका लयबद्ध आवाजाने भारल्यासारखं वाटायचं....

भरपूर पाऊस पडून गेल्यावर हिरव्यागार गवताच्या चाऱ्याने भरलेले रान बैलांना तृप्त करायचे.... तिसऱ्या प्रहरी बैल सजविण्यासाठी घरी घेऊन जायचे....वाटेत एखाद्या रगेल बैलाची गाठ झाली की बैलांची आपसात झुंज सुरू व्हायची.... तेव्हा आपल्या बैलाला काही दुखापत होणार तर नाही ना या काळजीने जीव पार घाबरा व्हायचा....मग कोणीतरी मोठी व्यक्ती आरडाओरडा करून ती झुंज सोडवायची....

घरी आणल्यावर बैलांची सजावट सुरू व्हायची.... पुन्हा एकदा हिंगळाचा डबल हात देऊन शिंगांना रंगीबेरंगी बेगड चिकटवले जायचे.... दुपारी धुवून स्वच्छ केलेल्या बैलांच्या अंगावर छान नक्षी काढली जायची.... नक्षी काढण्यासाठी एरंडाचे पान फाडून कोंबडीच्या पायासारखी किंवा कुळवाचे वसे घेऊन गोल गोल आकार रंगात बुडवून काढले जायचे....आमची बैलं शक्यतो मारकी असायची..‌‌.. आबांनी धरायची अन् मी नक्षी काढायची किंवा मी भीतभीत वेसण धरायची अन् आबांनी रंगावायची....त्यात रंगवताना बैलाच्या पोटावर आपले नाव लिहीले की खूप आनंद व्हायचा....शिंगांना फुगे, पायात कार्हाळ्याच्या फुलांचा तोडा, काहींच्या बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झुली, कपाळावर बाशिंग असायचे.... त्या सगळ्या साजात बैल अतिशय सुंदर दिसायचे.... वाडीतील तबाजीमामा औटी, शहाजी काका कळमकर, रघूआबा कळमकर यांचे बैल खिल्लारे व देखणे असायचे.... आमच्या दत्तू तात्यांच्या घरी लहान मुले नसल्याने मी तात्याची बैले रंगवून द्यायला मदत करायचो...‌मिरवणुकीतही तीच बैले माझ्याकडे असायची.... मिरवणूकीत हातात बैल असले की फार अप्रूप वाटायचे....‌

संध्याकाळी साडेपाच - सहाच्या दरम्यान दादू शेलारचे डफडे वाजायला सुरुवात व्हायची.... आमच्या घराच्या जवळ वाडीतील सर्व बैले एकत्र जमायला सुरुवात व्हायची....मग वाजत गाजत मिरवणूक सुरू व्हायची.... मिरवणूक सुरू असताना मध्येच एखाद्याचा अवखळ गोर्हा किंवा बैल मुसंडी मारून पळून जायचा.... त्याला धरण्यासाठी अनेक तरबेज गडी पाठीमागे धावायचे....

मारूती मंदिराजवळ मिरवणूक आली की तरूण गडी ढोल्या हिरामण गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली लेझमाचा डाव धरायचे..‌‌.. पाडळी वरून आलेले जाधव मंडळींपैकी कोणीतरी त्यांना ताशा व सनईची साथ द्यायचे...‌.ढीपांग...निपांग...ढिढाडाडी.... ढींपांग चालीवर डाव रंगात यायचा....रामा पाटील यांची मानाची बैलजोडी दादू शेलार यांनी खास पोळ्यासाठी लावलेल्या आंब्याच्या पानांच्या तोरणा खालून वेशीतून पुढे गेली की पोळा फुटायचा....‌वेशीतून आपली बैलजोडी घालताना मारूती मंदिराच्या भिंतीवर नारळ आपटून फोडला जायचा...‌.तो फोडलेला नारळ घेण्यासाठी वाजंत्री दादू शेलार व आम्हा मुलांच्यात मोठी स्पर्धा लागायची..‌‌.. मारूती मंदिराच्या समोर बैलजोडी आली की बैलाचे वशिंड जोरात दाबून बैल देवासमोर गुडघ्यावर बसविण्यासाठी मोठे कसब लावले जायचे...‌‌.अंबरनाथ वरून अवार्जून पोळ्यासाठी आलेले शिवादादा आपल्या ताकदीने हमखास बैल हटवायचे...‌‌.त्या काळी प्रत्येकाकडे शेती कामासाठी बैलजोड असायची.....संपूर्ण वाडीत मिळून शेकडो बैल असायचे...‌‌.वाजत- गाजत, अत्यंत उत्साहात मारूती मंदीराला प्रदक्षिणा घालून मिरवणूक पुढे खालच्या मळ्यात दत्त मंदिराकडे जायची.... दर्शन घेऊन दत्त मंदिराला प्रदक्षिणा घालून बैलांची पांगापांग व्हायची.... आता अंधार पडू लागलेला असायचा....घरी आल्यावर घरधनीन बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा गोड घास भरवायची....किती निर्मळ व सात्विक भावना? वर्षभर आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या आपल्या या लेकरांसमान बैलांना या दिवशी जो जीव लावतो; त्याला खरचं तोड नाही....हे प्रेम फक्त शेतकरीच करू शकतो....!

पोळा सणाला आलेले पै-पाहुणे ही सुद्धा एक पर्वणी असायची. जेवणखाणं झाल्यावर पाहुण्यांसोबत गप्पांचा फड रंगायचा....ख्याली- खुशाली बरोबरच सुख- दुःखाची विचारपूस व्हायची.... माणसं साधी- भोळी होती पण जिव्हाळा जपणारी होती...‌‌खरंच त्या काळी बैल पोळ्याची रंगत न्यारीच होती....!

आता काळ बदलला, माणसं बदलली..... यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली....‌बैलपोळ्याच्या मिरवणुकीतील ढोल, ताशा, लेझमाची जागा डी‌. जे. तालावर थिरकणाऱ्या नर्तिकेने घेतली....खरंच ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या बैलपोळ्याची मजा बदलताना मी डोळ्यांदेखत पाहिली...‌‌.

गोकुळ कळमकर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post