अहिल्यानगर : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदी, ओढे आणि नाल्यांना मोठा पूर आला आहे. तरी देखील काही शाळांच्या स्कूल बस चालकांनी पुराच्या पाण्यातून बस नेण्याचा धाडसी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा निर्णय घेतला. अहिल्यानगर परिसरात अशाच एका धोकादायक प्रकाराची घटना घडली आहे.
आज सकाळी शालेय वेळेत काही स्कूल बस चालकांनी शॉर्टकट मार्गाने वेळ आणि डिझेल वाचवण्यासाठी पूरग्रस्त रस्त्यावरून बस नेल्या. यावेळी पुराच्या पाण्याचा जोर इतका होता की, एका दुचाकीस्वाराला प्रवाह ओढून घेऊ लागला.
सुदैवाने काही नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला वाचवले. मात्र, घटनास्थळी प्रशासनाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, ही खेदाची बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर असूनही, त्यांनी पुराच्या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पर्यायी सुरक्षित मार्ग वापरण्याऐवजी धोकादायक मार्ग निवडल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
अनेक पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि शिक्षण विभागाकडे संबंधित बस चालक व शाळा व्यवस्थापनावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"बस चालकांनी डिझेलची बचत करण्यासाठी आमच्या मुलांचे प्राण धोक्यात घातले. हे माफ करता येणार नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने दिली.
पुराच्या काळात जिल्हा प्रशासनाने वाहतूक बंदीचे आदेश दिले असताना देखील असे प्रकार घडत असल्याने, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याअगोदरही अशा घटना घडून गेल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने असे प्रकार वाढीस लागले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ होणार नाही.
Post a Comment