आढळगाव गटात राजकीय भूकंप! माजी आमदार राहुल जगताप यांच्या गोटात जाणार ‘तो’ बडा नेता

अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या आढळगाव गटातील राजकारणात सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. या गटातील एक बडा नेता लवकरच माजी आमदार राहुल जगताप यांच्या गोटात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


या दोघांमध्ये मागील काही दिवसांत गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे गटातील वातावरण चांगलेच तापले आहे.

सदर नेत्याने अलीकडच्या काळात आपल्या स्थानिक पातळीवरील सहकाऱ्यांबरोबर असंतोष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातच राहुल जगताप यांच्याशी त्यांची बैठक झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. 

या भेटीनंतर तो नेता जगताप यांच्या नेतृत्वावर खूश असून लवकरच निर्णय जाहीर करू शकतो, अशीही चर्चा आहे.


आढळगाव गटात याआधीपासूनच राजकीय गटबाजी कायम आहे. ग्रामपंचायत, पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत या गटातील दोन वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये संघर्ष दिसून आला आहे. 

आता या नव्या हालचालीमुळे विद्यमान गटाचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी आमदार राहुल जगताप यांनी अलीकडच्या काळात आपला पक्ष आणि गट संघटनात्मकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांशी संवाद सुरू केला आहे. त्यात आढळगाव गटातील या नेत्याची भर पडल्यास जगताप गोटाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मोठा फायदा होऊ शकतो, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

या घडामोडीमुळे आढळगाव गटातील राजकीय समीकरणे नव्याने मांडली जात आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल कितपत परिणामकारक ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post