राहुरी : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, मका, घास यांसारख्या प्रमुख पिकांचे हजारो हेक्टरवर नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे.
या पार्श्वभूमीवर क्रांतीसेना राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-निवेदन पाठवून राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई बरोबरच कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेले पीक वाहून गेले असून काही भागांत पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून त्यांच्या उपजीविकेवर घाला बसला आहे. शासनाने वेळेत मदत केली नाही तर शेतकरी बांधव हताश व निराश होतील.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आतापर्यंतची मदत तुटपुंजी असल्याने, खरी गरज ही भरीव निधीची असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तातडीने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याचे निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवेदनावर क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, रंगनाथ माने, मच्छिंद्र जगताप, अरूण थोरात, पश्चिम महाराष्ट्र संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, अविनाश कुरुमकर, संदीप उंडे, बाबासाहेब चेडे, शब्बीर शेख, शेखर पवार, शाम कदम, बाळासाहेब भोर, संदीप डेबरे, साजन शेख, सोमनाथ वने, प्रतिक गाडे, हर्षद धोंडे आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment