निंबळकमध्ये बालकावर बिबटयाचा हल्ला

अहिल्यानगर : दोन दिवसांपूर्वीच नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे पाच वर्षाच्या मुलीला बिबट्याने ठार केले होते. त्याच आता एमआयडीसी लगतच्या निंबळक येथील कोतकर वस्तीवर राजवीर रामकिसन कोतकर या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला  केला. पण या हल्ल्यातून मुलगा बालबाल बचावला असला तरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


नगर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे. तालुक्यातील बहुतांश सर्वच गावात बिबट्याचे दर्शन घडत आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने कुत्रे, बकर्‍या, गायी यांच्यावर हल्ले केले आहेत. पण आता बिबटे मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ले करत आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच खारेकर्जुने येथील रियांका पवार या पाच वर्षांच्या मुलीला सायंकाळी सुमारास पालकांच्या डोळ्यादेखत बिबट्याने पळवून नेले होते. तब्बल 16 तासांनी तिचा मृतदेह सापडला होता. दरम्यान, गुरूवारी बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, या मागणीसाठी खारेकर्जुने  ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले होते.

ही घटना ताजी असताना शुक्रवारी त्याच परिसरात एमआयडीसी लगतच्या निंबळक  येथील वैष्णव माता मंदिर परिसरात असणार्‍या कोतकर वस्तीवरील राजवीर कोतकर या मुलावर बिबट्याने हल्ला केला. हा मुलगा सायंकाळच्या सुमारास खेळत असतांना बिबट्याने त्याच्यावर हल्ला  केला. नशीब बलवत्तर म्हणून तो बिबट्याच्या तावडीतून सुटला. मात्र, नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात राजीवर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी अहिल्यानगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कोतकर वस्ती, निंबळक गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post