नगर तालुका : नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून आज पुन्हा एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. खारे कर्जुने येथे आज सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास बिबट्याने घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीला उचलून नेले.
मुलीचे नाव रियांका सुनील पवार (वय ५) असे असून, ती आपल्या कुटुंबासोबत शेतावर असलेल्या वस्तीवर राहत होती. थंडी वाढल्याने कुटुंबातील सदस्य शेकोटीभोवती बसलेले असताना ही घटना घडली. रियांका जवळच खेळत असताना शेजारील तुरीच्या शेतातून अचानक एक बिबट्या आला आणि क्षणातच तिला उचलून घेऊन गेला.
या घटनेने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी आरडाओरड करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या अंधारात पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शोधमोहीम सुरू केली, परंतु रात्री उशिरापर्यंत मुलगी सापडली नव्हती.
दरम्यान, पोलिस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. मंगळवारीच कामरगाव येथे वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर केवळ एकाच दिवसात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment