कोपरगाव ः कोपरगाव तालुक्यात राजकीय संघर्ष मोठ्या प्रमाणात उफळून आलेला आहे. काळे व कोल्हे गट एकमेकांना शह, काटशह देत आहे. आमदार आशुतोष काळे यांनी काका कोयटे यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये घेऊन कोल्हे गटाला शह दिला होता. आता कोल्हे गटाने काळे यांना काटशह दिलेला आहे.
कोपरगावमध्ये गुरुवारी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली होती. त्या राजकीय घटनेला २४ तास होत नाही. तोच पुन्हा एका राजकीय घडामोड घडलेली आहे. ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल व गुरमितसिंग दडीयाल यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रविकाका बोरावके, हरिभाऊ गिरमे, कैलास खैरे, नरेंद्र डंबीर, नसीर सय्यद,विनोद राक्षे,सुशांत खैरे,नितीन वानखेडे,हुसेन सय्यद आदी उपस्थित होते.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि विकासाभिमुख राजकारणासाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या युवानेते विवेक कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वावर विश्वास ठेवून दडीयाल बंधूंसह कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. विवेकभैय्या यांनी अल्पावधीतच सेवा आणि स्वच्छ राजकारणाचा ठसा उमटवला असून, त्यांच्याभोवती वाढणारा जनसमर्थनाचा उंचावलेला आलेख आजच्या प्रवेशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दुसरीकडे, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या काका कोयटेंच्या आणि आमदार काळे यांच्या मनसुब्यांना युवानेते विवेक कोल्हे यांनी एकाच दिवसात सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात आहे. कोपरगावच्या भविष्याकडे पाहताना, स्वच्छ नेतृत्व आणि पारदर्शकतेवर आधारित राजकारणाची जनतेची अपेक्षा वाढत असताना, आजचा प्रवेश हा शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवणारा ठरला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सबका साथ, सबका विकास या तत्वज्ञानावर विश्वास ठेवत दडीयाल बंधूंनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.यासह लवकरच यापेक्षाही मोठा धमाका होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Post a Comment