नेवासा : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची धावपट्टी सुरु होताच नेवासा राजकारणात अनपेक्षित समीकरणे उभे राहताना दिसत आहेत. पक्षीय उमेदवार समोर असले तरी, या वेळी अपक्षांची ताकद अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सचिन कडू, शिवसेनेचे करणसिंह घुले, काँग्रेसचे अल्ताफ खान पठाण, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नंदकुमार पाटील, तर अपक्ष म्हणून दिनकर घोरपडे, मनोज पारखे आणि अश्पाक शेख अशी उमेदवारांची तगडी रांग आहे.
पक्षांपेक्षा अपक्षच आघाडीवर असल्याची चर्चा जोर धरत आहे. गावपातळीवरील मजबूत नेटवर्क, घराघरांत पोहोचलेले संपर्क, तसेच गटांतील नाराजी यामुळे अपक्ष उमेदवारांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
यामुळेच विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांची डोकेदुखी वाढली आहे. नगराध्यक्षपद राखण्यासाठी दोन्ही नेत्यांना यावेळी चांगलीच धावपळ करावी लागणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. पक्षीय पातळीवर मतदारांची मते सिद्धांताने मिळतात, मात्र या वेळी अपक्षांचा वाढता प्रभाव समीकरणे गुंतागुंतीची करीत आहे.
“या वेळी लढत पक्षांमध्ये नाही; तर अपक्ष विरुद्ध ‘सत्ता’ अशीच होणार! आहे. आता पक्षीय नेते नाराजी शमवून संघटनेला कितपत सुसंगत करतात आणि अपक्षांची वाढती घोडदौड थोपवतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नेवासा नगराध्यक्षपदाची ही लढत आता चुरशीच्या नव्या टप्प्याकडे वळली असून, पुढील काही दिवसांत राजकीय तापमान आणखी वाढणार हे निश्चित.

Post a Comment