संगमनेर : नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी सेवा समितीच्या उमेदवारांची घोषणा करताना शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृढनिश्चय व्यक्त केला. “सेवा समितीकडून 20 नवीन चेहरे आणि 11 अनुभवी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा लौकिक वाढवण्यासाठी तसेच अत्याधुनिक योजनांसह शहर हायटेक करण्यासाठी सर्व उमेदवार कटिबद्ध आहेत,” असे त्या म्हणाल्या.
तांबे यांनी पुढे सांगितले की, “महिलांची सुरक्षितता, ट्रॅफिक नियंत्रण आणि धूळमुक्त संगमनेर घडवण्यासाठी पहिल्या शंभर दिवसांचे नियोजन आमदार सत्यजीत तांबे यांनी तयार केले आहे.” मात्र त्यांच्या या दाव्यांवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.
“निवडणुकीच्या काळात अशा घोषणा करणे सोपे असते. परंतु याआधीच्या काळात शहराच्या विकासासाठी किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी काय ठोस काम केले? कोणती पायाभूत सुविधा उभारली? महिलांसाठी राबवलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ किती जणींना मिळाला?” असा थेट सवाल शिवसेनेने उपस्थित केला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी असेही म्हटले की, “संगमनेरमध्ये ट्रॅफिकची समस्या, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि महिलांसाठी सुरक्षितता उपाययोजना यावर अद्यापही समाधानकारक पावले उचललेली नाहीत. शहर हायटेक करण्याच्या घोषणा त्या वेळीच उठतात जेव्हा निवडणुका दारात येतात.”
या आरोप-प्रत्यारोपांमुळे संगमनेरचा राजकीय पारा पुन्हा चढला असून नागरिकांमध्ये या विषयावर मोठी चर्चा रंगली आहे. आता डॉ. मैथिली तांबे या टीकेला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment