अहिल्यानगर : सोशल मीडियावरील फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये अनुचिसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद व जातिवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रूपाली रासकर हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सारीका संदीप गांगुर्डे (रा. बोल्हेगाव ता. अहिल्यानगर) यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास फेसबुकवर ‘रूपाली रासकर’ या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेला सुमारे ४३ मिनिटांचा फेसबुक लाइव्ह व्हिडीओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद, जातिवाचक भाषा वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्हिडीओमध्ये १७ ते १७.१० मिनिटांच्या दरम्यान ही आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.
फिर्यादी सारीका गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सदर वक्तव्यांमुळे संपूर्ण समाजाची बदनामी झाली असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सामाजिक सलोखा बिघडवणारी ही कृती असून यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१) व संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ जानेवारी रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Post a Comment