अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीने आपली ताकद दाखवून दिली असून, तब्बल पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हे यश आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही वर्षांत शहरात राबवलेल्या ठोस विकासकामांची पावती मानली जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरी सुविधा आणि विविध विकास प्रकल्पांमुळे नागरिकांचा विश्वास महायुतीकडे अधिक दृढ झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीने शहराच्या राजकारणात भक्कम पकड निर्माण केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिनविरोध निवडी झाल्याने सत्तेचा कौल आधीच स्पष्ट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधून पुष्पां अनिल बोरुडे, प्रभाग क्रमांक ६ मधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे भाजपचे उमेदवार कोणताही सामना न होता बिनविरोध विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून प्रभाग क्रमांक ८ मधून कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक १४ मधून प्रकाश भागानगरे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
एकूणच, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या विकासकामांमुळे विरोधकांना उमेदवार उभे करण्यासही अडचणी आल्याचे बोलले जात आहे. निवडणूकपूर्व टप्प्यातच मिळालेल्या या बिनविरोध यशामुळे अहिल्यानगरमध्ये सत्ता एकहाती येण्याचे संकेत अधिक ठळक झाले आहेत.
महापालिका निवडणुकीत एकाच वेळी पाच नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही घटना राजकीय वर्तुळात ‘भूतो न भविषयती’ अशी मानली जात आहे. हे यश महायुतीच्या संघटनात्मक ताकदीसह आमदार संग्राम जगताप यांच्या विकासाभिमुख आणि जनकेंद्री राजकारणाचा थेट परिणाम असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment