मुख्यमंत्र्यांनी रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच काय झालं ते सांगावं

अहिल्यानगर : मनपाने केलेल्या शहरातील ७७८ रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ठाकरे शिवसेनेने त्याच्या चौकशीची मागणी करून सहा महिने झाले. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न करता भ्रष्टाचाऱ्यांना  पाठीशी घालण्याचे काम केले आहे. मनपा निवडणुकीसाठी अहिल्यानगरकरांना आश्वासनांची गाजरं देण्या पेक्षा घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले, हे अहिल्यानगरकरांना आधी सांगावे, असा टोला ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी लगावला आहे. 


प्रभाग पाचच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली दरम्यान काळेंनी मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, युवा सेनेचे आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले, शंभर कोटींहून अधिक खर्च करून शहरात पाणी योजना राबवली गेली. मुळा  धरणामध्ये नगर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी पुरेसा कोटा राखीव असताना देखील शहराच्या अनेक भागांमध्ये आजही दोन दोन, तीन तीन दिवस पाणी येत नाही. ठराविक प्रमुख रस्ते सोडले तर आजही अनेक भाग रस्त्यांपासून वंचित आहेत. विकास कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकीय व्यवस्थेमुळे शहराचा विकास खुंटला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी ही घाण साफ करावी. 

सन २०१८ च्या मनपा निवडणुकीत भाजपने अहिल्यानगरकरांना ३०० कोटी देण्याची घोषणा केली होती.  आठ वर्ष झाली. मात्र अजून त्या ३०० कोटींची कामं नगरकरांना पाहायला मिळाली नाहीत. सत्ताधारी बेगडी हिंदुत्वाच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहोत, असा टोला किरण काळे यांनी लगावला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post