महापालिका प्रचारात शहर हरवलं, घोटाळेच केंद्रस्थानी

अहिल्यानगर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत शहराच्या भविष्यासाठीचे मुद्दे मागे पडले आणि आर्थिक घोटाळ्यांची चर्चा मात्र केंद्रस्थानी राहिली. प्रचारसभेचं व्यासपीठ शहराच्या विकासाचा आराखडा मांडण्यासाठी असतं, मात्र या सभेत गोरगरिबांचे पैसे बुडाल्याचा आरोप करत घोटाळ्यांचा विषय पुढे आला. त्यामुळे “ही सभा महापालिकेसाठी होती की केवळ राजकीय संदेश देण्यासाठी?” असा सवाल उपस्थित होत आहे.




पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिस्पे, ग्रोमोअर यांसारख्या कंपन्यांनी आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली. या घोटाळ्यांमागे कोण आहे, हे सर्वांनाच माहिती असल्याचे सूचक विधान त्यांनी केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून गोरगरिबांना लुटणाऱ्यांना सोडणार नसल्याचा ठाम इशारा दिला.

मात्र, या आरोप-प्रत्यारोपांचा मुद्दा महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत नेमका का आणण्यात आला, हा प्रश्न आता माहितीपूर्ण कार्यकर्ते, मतदार आणि पक्षातीलच काही ज्येष्ठ नेते विचारू लागले आहेत. शहरातील पाणीपुरवठा, खराब रस्ते, वाढती वाहतूक कोंडी, आरोग्य सेवा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना, राज्यस्तरीय घोटाळ्यांनी संपूर्ण सभेचा रोख बदलल्याचे दिसून आले.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमधूनही यावर नाराजी व्यक्त होत आहे. घोटाळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, याबाबत दुमत नाही; मात्र त्यासाठी योग्य व्यासपीठ वेगळे असते, असे मत व्यक्त केले जात आहे. महापालिका निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार कसा असावा, शहराचा विकास कोणत्या दिशेने न्यावा, यावर जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी असते, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील महापालिकेच्या शाळांची अवस्था हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे आणि शिक्षणाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका मांडावी, अशी अपेक्षा होती. मात्र, या गंभीर प्रश्नावर प्रचारसभेत कोणतीही ठोस चर्चा झाली नाही.

याचबरोबर, यावेळी विद्यमान नगरसेवकांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्याने आधीच प्रभागनिहाय नाराजी आहे. अनेक प्रभागांमध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि मतदार अस्वस्थ आहेत. ही नाराजी दूर करणे, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे आणि संघटन मजबूत करणे गरजेचे असताना, प्रचारसभेत त्याकडेही दुर्लक्ष झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

एकंदर पाहता, प्रचारसभेतून शहराच्या प्रश्नांना अपेक्षित न्याय मिळालेला दिसत नाही. आरोप, इशारे आणि राजकीय संदेश यांतून सभेचा गाभा बदलला. त्यामुळे मतदारांच्या मनात “आपल्या शहरासाठी नेमकं काय?” हा प्रश्न अधिक ठळकपणे उभा राहिला आहे. महापालिका निवडणूक केवळ राजकीय रणांगण न राहता शहराच्या विकासाचा खरा मंच ठरतो का, याचं उत्तर आता मतदारच देतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post