बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई; ट्रान्सफॉर्मर कंपनीत दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

अहिल्यानगर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपवर शस्त्रास्त्रांचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात बेलवंडी पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात ७ सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपी मूळ उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील असून सध्या संगमनेर व पुणे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.


२७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कोळगाव शिवारातील चिखली घाट येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपवर ही धाडसी घटना घडली. आरोपींनी वर्कशॉपच्या मागील बाजूने पत्रे उचकटून आत प्रवेश केला.

यावेळी तेथे उपस्थित असलेले मजूर व वॉचमन सुभाष पवार यांचे हात टेपने बांधून ठेवण्यात आले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. “सकाळपर्यंत बाहेर आलात तर तुमचा काटा काढू,” अशी धमकी देऊन टोळीने वर्कशॉपचे शटर उघडले आणि बाहेर थांबलेल्या साथीदारांना आत बोलावले.

यानंतर आरोपींनी ट्रान्सफॉर्मरमधील मोठ्या प्रमाणात तांबे (कॉपर) व इतर मौल्यवान साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. या घटनेप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

तपासादरम्यान संबंधित आरोपी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या एका अन्य गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने बेलवंडी पोलिसांनी आरोपींचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून आता या टोळीने महाराष्ट्रातील इतर भागातही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह बेलवंडी पोलीस पथक, दक्षिण मोबाईल सेल व होमगार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post