मुळा कारखाना निवडणुकीत गडाखांचे पारडे जड? विरोधकांवरच उलटू लागली टीकेची धार

अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने आता चांगलाच वेग घेतला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाचे नेते तथा माजी मंत्री  शंकरराव गडाख यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होतील, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काहीसे वेगळे दिसून येत आहे.


कारखान्याविरोधात एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या विरोधी गटाकडून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट, टीका आणि प्रचार मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. कारखान्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न होत असला तरी या पोस्टना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

उलटपक्षी, सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या अनेक पोस्टवर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक प्रतिक्रिया देत विरोधकांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. काही ठिकाणी विरोधी नेत्यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकांपासून ते त्यांच्या कार्यपद्धतीपर्यंत विविध मुद्द्यांवर टीका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाविरोधात वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या पोस्टवर अनेक सभासदांकडून कारखान्याच्या विकासकामांचा, सभासदांना मिळालेल्या सुविधांचा आणि मागील काळातील निर्णयांचा उल्लेख करून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील लढाईत विरोधकांना अपेक्षित यश मिळत नसल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात रंगू लागली आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विरोधकांवर प्रतिटीकेची वेळ येणे हे त्यांच्यासाठी चिंतेचे कारण ठरू शकते. निवडणूक अजून पुढे सरकणार असली तरी सध्याच्या परिस्थितीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तथापि, निवडणुकीत अंतिम निर्णय हा सभासदांच्या मतपेटीतूनच होणार असल्याने येत्या काळात प्रचाराचा जोर वाढल्यानंतर राजकीय समीकरणे बदलतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post