लाखोंच्या सीसीटीव्ही प्रकल्पावर प्रश्नचिन्ह...नेवाशात नगरोत्थान योजनेतील यंत्रणा ठप्प; नागरिकांकडून तांत्रिक चौकशीची मागणी

नेवासा : नेवासा शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक ठिकाणांवर देखरेख वाढविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेला सीसीटीव्ही प्रकल्प आता चर्चेचा विषय ठरत आहे. नगरोत्थान योजनेतून उभारण्यात आलेल्या या यंत्रणेतील बहुतांश कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची चर्चा शहरात सुरू असून, लाखो रुपयांच्या खर्चानंतरही अपेक्षित परिणाम न मिळाल्याबद्दल नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्हे उघडकीस आणण्यास मदत करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश होता. त्यानुसार २७ ठिकाणी एकूण ७८ सीसीटीव्ही कॅमेरे आणि पाच पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात केबल टाकण्यात आल्याची नोंद आहे.

या कामाची सुरुवात जुलै २०२२ मध्ये झाली आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. करारात देखभाल आणि दुरुस्तीची अटही समाविष्ट करण्यात आली होती. मात्र हमी कालावधीनंतर यंत्रणेतील अडचणी वाढल्याची चर्चा पुढे येत आहे.

सध्या अनेक ठिकाणचे कॅमेरे कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची स्थिती अशी का झाली, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post