मुळा पाटबंधारेच्या निविदांवर आक्षेप.... निविदा रद्द करा : उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अहिल्यानगर : मुळा पाटबंधारे विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी गिते यांच्याकडे करण्यात आली आहे.


याबाबत तक्रारदार मंगेश पागिरे, प्रणव मुनोत, आशिष खंडागळे यांनी निवेदन दिले.  यामध्ये म्हटले आहे की, प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेचा अभ्यास केला असता, अनेक लहान स्वरूपाची कामे कोणतीही तांत्रिक आवश्यकता नसताना जाणीवपूर्वक एकत्रित करून मोठ्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

शासन नियमांना बगल देत अनेक लहान कामांचे बेकायदेशीर 'आर्टिफिशियल क्लबिंग' करून ठराविक मोठ्या कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. स्वतंत्र मंजुरी असलेल्या अनेक कामांचे कृत्रिम एकत्रीकरण करून निविदेची रक्कम नेवासा येथील २२ गावाकरिता ३१.३९ कोटींपर्यंत वाढविण्यात आली. 

त्यामुळे तांत्रिक अनुभव, यंत्रसामग्री आणि आर्थिक उलाढालीच्या अटी अधिक कठीण बनल्याने स्थानिक लहान कंत्राटदार व सुशिक्षित बेरोजगार अभियंते या प्रक्रियेपासून दूर झाले. विभागीतील जबाबदरा अधिकाऱ्यांनी निविदा उघडण्याच्या दिवशीच कोणताही ठोस तांत्रिक आधार न देता उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निविदांमध्ये BOQ व DTP मध्ये कामांचे स्पष्ट गावनिहाय तपशील, प्रशासकीय मान्यता व प्रत्यक्ष कामाचे स्वरूप नमूद करण्यात आलेले नसल्याचे म्हटले आहे.

निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे तक्रार प्रलंबित असतानाच 'टेक्निकल बिड' ऑनलाइन उघडण्यात आले आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून नव्याने स्वतंत्र निविदा काढाव्यात. अन्यथा याबाबत आम्ही कोर्टात जाणार आहे. - मंगेश पागिरे, तक्रारदार.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post