अहिल्यानगर : मतं मागायला सभासदांच्या दारात... पण गुणवंत मुलांच्या सत्कारावेळी मात्र काहींची उपेक्षा? अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेनंतर सभासदांनी संताप व्यक्त केला. पाहूया हा रिपोर्ट...
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉनमध्ये पार पडली. जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासदांची ही महत्त्वाची संस्था आहे.
तब्बल २२ वर्षांनंतर सत्तेवर आलेल्या स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या कारकिर्दीतील ही दुसरी वार्षिक सभा ठरली. मात्र सभेत आर्थिक विषयांपेक्षा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा मुद्दाच अधिक चर्चेत राहिला.
काही सभासदांच्या आरोपानुसार, पात्र असूनही त्यांच्या गुणवंत पाल्यांना सत्कारापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "मतं मागायला येता... मग सत्काराच्या वेळी का सरकता?" असा संतप्त सवाल उपस्थित केला.
सभासदांचे म्हणणे आहे की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा कोणत्याही गटाचा नसून संपूर्ण सभासद कुटुंबाचा सन्मान असतो. त्यामुळे अशा कार्यक्रमात भेदभाव होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, या आरोपांबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध केले जाईल.
काही सभासदांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया पारदर्शक करण्याची आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात सोसायटीचे पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment