राजकारण थांबवा, आधी केबल हटवा; नेवाशात नागरिकांचा थेट इशारा!

 नेवासा : शहराला केबल व इंटरनेटच्या धोकादायक वायरींचा विळखा पडला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. येत्या आठ दिवसांत शहरातील लोंबकळणाऱ्या वायरी हटविल्या नाहीत, तर नगरपंचायत कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता कुलूप ठोकून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.


शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच अनेक निवासी भागांमध्ये केबल व इंटरनेटच्या वायरींचे अनियंत्रित जाळे निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी या वायरी वीज खांबांवर अस्ताव्यस्त लटकलेल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या थेट घरांच्या गच्च्या, बाल्कनी आणि प्रवेशद्वारांवरून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे या वायरी तुटून खाली पडण्याचा धोका अधिक वाढतो. अशा वेळी पादचारी, दुचाकीस्वार, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

या प्रश्नाबाबत नगरपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांच्याकडेही हा विषय मांडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संताप वाढत आहे.

शहरात सेवा देणाऱ्या केबल व इंटरनेट कंपन्यांनी वापरात नसलेल्या वायरी तातडीने हटविणे, लोंबकळणाऱ्या वायरी सुरक्षित करणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

"जनतेने तुम्हाला तुमचे राजकारण पाहण्यासाठी नव्हे, तर आमचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रतिनिधी निवडून दिले आहेत," अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी राजकीय वाद बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अन्यथा जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. शहरातील धोकादायक केबलचे जाळे हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.   

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post