संगमनेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्या समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल शनिवारी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेत कारवाईची मागणी केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवडी २९ ऑक्टोबर रोजी झाल्या होत्या. त्यामुळे संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात संगमनेर, अकोले, कोपरगाव या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला होता.
या गंभीर बाबीची दखल घेत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी तात्काळ सर्व नवीन करण्यात आलेल्या नियुक्त्यांना शुक्रवार दिनांक ४ नोव्हेंबरला स्थगिती दिली. या स्थगितीला शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे जबाबदार असल्याचे मानून संगमनेरात काही समाजकंटकांनी खेवरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
ही बाब निष्ठावान शिवसैनिकांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची भेट घेत निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुका प्रमुख जनार्दन आहेर, उपजिल्हाप्रमुख ॲड.दिलीप साळगट, शहर प्रमुख प्रसाद पवार, युवासेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, शहरसंघटक पप्पू कानकाटे, उप तालुकाप्रमुख सोमनाथ काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर नगर जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या याची कुठलीही कल्पना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना नव्हती. ते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले होते. नवीन नियुक्त्याना वरिष्ठ स्तरावरून स्थगिती देण्यात आली. या स्थगितीत जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे त्यांचा पुतळा जाळणे शिवसैनिंकाना शोभत नाही. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर शिवसेनेच्या वरिष्ठ स्तरावरून तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार यांनी केली.
Post a Comment