अहिल्यानगर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या विशेष स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढाकाराने हे अभियान १ मे ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत "वाटचाल दृश्यमान शाश्वत स्वच्छतेकडे" या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणार आहे.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण भागातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, घनकचऱ्याचा पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबविणे असून, यासाठी १३८ दिवसांचे विशेष अभियान आखण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेऊन तालुकानिहाय नियोजन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अभियानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गाव पातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय व गावातील प्रमुख ठिकाणी सूचना लावून माहिती प्रसारित करणे, घरगुती व सार्वजनिक स्तरावरील ओला व सुका कचरा संकलित करून ठेवणे, तसेच १ मे रोजी ग्रामसभा आयोजित करून अभियानाची माहिती देत गोळा केलेला ओला कचरा नॅडेप खड्ड्यात टाकून अभियानाची सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार असून, या अभियानात लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, महिला बचतगट, युवक मंडळे यांचा सक्रीय सहभाग असणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक सुभाष सातपुते यांनी केले आहे.
Post a Comment