कांदा व फळबागांचे मोठे नुकसान

अहिल्यानगर : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी  खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.


लंके सध्या कामकाजानिमित्त नवी दिल्लीत असून, महाराष्ट्र सदनामध्ये मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, अवकाळी पावसामुळे कांदा व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सरकारने पंचनामे केवळ कागदावर न करता तात्काळ आर्थिक मदत द्यावी.

लंके म्हणाले की, कर्जमाफीच्या घोषणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जफेड थांबवली होती. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचण येत आहे. अशा परिस्थितीत सरकारने बँकांना तातडीने शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली.

शेतमालाला योग्य बाजारभाव मिळालेला नाही, त्यात आता पावसामुळे शेती व घरे दोन्हींचे नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्याला केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे,” असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याबाबत विचारले असता खा. लंके म्हणाले. बांधावर जाण्यापेक्षा आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी असतो. त्यांच्या वेदना आम्हाला नेहमी जाणवतात. आम्ही फक्त फोटो काढण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post