अमर छत्तीसे
श्रीगोंदा ः जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीला अजून अवधी असला तरी श्रीगोेंद्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांकडून आतापासून मोर्चे बांधणी सुरु झालेली आहे. त्यामुळे गट व गणात होणार्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास काहींनी सुरवात केल्याने निवडणूक आल्याची चाहूल आता सर्वांना लागली आहे.
हे वाचा ः बहरलेल्या प्रेमाला लागले ग्रहण..
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला अजूनही चार महिन्यांचा अवधी आहे. परंतु त्या अगोदरच आता काहींनी राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केलेली आहे. गट व गणात आता सध्या बैठका सुरु झालेल्या आहेत. तर काहींनी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यावर भर दिलेला आहे. मात्र या सर्व हालचाली गुप्त पणे सुरु असल्या तरी त्याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांमधून होत आहे.
कोरोना काळात ज्यांनी तालुक्याकडे पाठ केली होती. त्यांना आता निवडणुकीची चाहूल लागताच आता मतदारांची आठवण आलेली आहे. मतदारांच्या घरी होणार्या धार्मिक कार्यक्रमांबरोबर इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरवात केलेली आहे. कधी न येणारे नेते अचानक कार्यक्रमांना येऊ लागल्याने चर्चा सुरु झाली असून निवडणूक आली काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडू लागलेला आहे.
काही इच्छुकांनी शाळा व मंदिरांसाठी आता मदत देण्यास सुरवात केलेली आहे. ही मदत अल्प असली तरी त्याचा फायदा मंदिर व शाळांना होत आहे. या नेत्यांकडून आता खिरापत वाटप होऊ लागल्याने काहींनी आता त्यावर ताव मारण्याचा निर्णय घेऊन गावाचा विकास साधण्याची युक्तीसाधली आहे. त्यामुळे इच्छुकांची आगामी काळात चांगलीच पंचायई होण्याची शक्यता आहे.
हे वाचले का ः संस्काराची शिदोरी वाटणारे आमचे आबा....
मोर्चेबांधणी सुरु झालेली असली तरी गट व गणाचे आरक्षण अद्याप पडलेले नाही. त्यातच इच्छुकांनी आपल्या परिने अंदाज बांधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. काहींनी थांबा व पहा अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.
या निवडणुकीवर आगामी आमदारकी व खासदारकीचे गणिते ठरलेले आहेत. त्यामुळे आता खासदार डाॅ. सुजय विखे व आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार हे काय आडाखे टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेते ठरवतील त्यांनाच जिल्हा परिषद व पंचायत समितीला उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे काहींनी नेत्यांकडे आपल्याच घरात उमेदवारी मिळावी, यासाठी काहींनी आतापासून नियोजन सुरु केलेले आहे. यासाठी नात्यागोत्याचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे.

Post a Comment