गुरुकुल मंडळाची प्रचारात आघाडी !

नेवासा : बहुचर्चित व बहुप्रतिक्षित अशा अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व विकास मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधील सर्व वातावरण ढवळून निघाले आहे. यामध्ये गृहभेटी, वैयक्तिक संपर्क या माध्यमातून जिल्ह्यामध्ये गुरुकुल मंडळांनी आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. 


येत्या 16 ऑक्टोबरला होणाऱ्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील साहित्यिक, शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर यांचे गुरुकुल व स्वराज्य मंडळ आघाडी, रावसाहेब     रोहोकले प्रणित गुरुमाऊली मंडळ, बापूसाहेब तांबे यांची गुरुमाऊली व ऐक्य मंडळ, तसेच राजेंद्र शिंदे यांनी उर्वरित सर्वांची मोट बांधून चौथा पॅनल तयार केला आहे. 

यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅनल नसल्याने यावेळेस होणारी निवडणूक ही चुरशीची होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. डॉ. संजय कळमकर यांच्या कल्पक नेतृत्वातून तसेच स्वराज्य मंडळाच्या तरुणांची फौज हाताशी असल्याने गुरुकुल स्वराज्य युतीला सभासदांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. 

गुरुकुल मंडळ प्रचार करत असताना कोणत्याही मंडळ अथवा उमेदवारावर टीकाटिप्पणी न करता सर्वसामान्य शिक्षक बंधू-भगिनींना उपयुक्त असा जाहीरनामा प्रसारित करून घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. शिक्षक बँकेबरोबरच बहुचर्चित अशी विकास मंडळाचीही निवडणूक त्यासोबत होत आहे. चारही मंडळाकडून दिग्गज असे उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर नेत्यांची आघाडी घेण्यासाठी कसरत सुरू आहे. 


गुरुकुल व स्वराज्य मंडळांनी प्रचारात आघाडी घेत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात वाडीवस्तीवरील शिक्षकांपर्यंत आपल्या मंडळाची विचारधारा पोहोचवण्याचे काम केले आहे. कोणते मंडळ कोणत्या तालुक्यात आघाडी घेईल याबाबत तर्कवितर्क केले जात असून सर्वसामान्य शिक्षकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे एकंदरीत सध्या गुरुकुल मंडळ प्रचारामध्ये आघाडी घेत असून अंतिम निकालासाठी 17 ऑक्टोबर ची वाट पहावी लागणार आहे.


गेल्या पाच वर्षांमध्ये संघटना पातळीवर शिक्षकांच्या प्रश्नांची सातत्याने सोडवणूक केली असून शिक्षक बँक व विकास मंडळाचा सर्वसमावेशक जाहीरनामा सभासदांसमोर गेल्याने आमचा विजय निश्चित आहे ,गुरुकुल मंडळाची वाढती ताकद लक्षात घेता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ,त्यामुळे कामाऐवजी आमचे उमेदवार व नेते यांच्यावर गलिच्छ आरोप करून चुकीचे राजकारण विरोधकांकडून केले जात आहे ,परंतु सर्वसामान्य मतदार गुरुकुल सोबतच असल्याने आम्हाला विजयाची चिंता नाही. -/भास्कर नरसाळे, उमेदवार, विकास मंडळ, नेवासा सर्वसाधारण मतदारसंघ !

Post a Comment

Previous Post Next Post