शेवगाव : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिलाचा कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगावमध्ये होत आहे. या मेळाव्यासाठी शेवगाव व पाथर्डीतील कार्यकर्त्यांना मी येतोय आपणही या अशी भावनिक साद माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. घुले काय बोलणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील आखेगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये आज मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शेवगाव व पाथर्डी मतदार संघातील विविध प्रश्नाबाबत व पुढील निवडणुकीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळेच घुले यांनी ही भावनिक साद सर्वांना आश्चर्य करायला लावणारी आहे. घुले आज काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
Post a Comment